अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक
नागपूर : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे विरोधक आक्रमक दिसले. भाजपचे सर्व आमदार ‘मी पण सावरकर’ असे लिहिलेली टोपी घालून विधिमंडळात दाखल झाले. सर्वांनी राहुल गांधी आणि शिवसेनाविरोधात घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. उद्धव ठाकरे होश मे आओ म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफीची मागणी भाजपने केली. पहिल्याच दिवशी भाजपचा हा पवित्रा पाहता हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. विधिमंडळाबाहेर भाजपचे सर्व आमदार हे भगव्या रंगाची आणि त्यावर ‘मी पण सावरकर’ असे लिहिलेली टोपी घातली होती. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली केल्याचा आरोप आमदारांनी केला. सावरकरांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधातही घोषणाबाजी केली. ‘सोनिया गांधी प्रणित शिवसेनेचा धिक्कार असो’, ‘होश मैं आओ, होश मैं आओ उद्धव ठाकरे होश मैं आओ’ अशा घोषणा दिल्या.