पुणे – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे ते मळवली, पुणे ते बारामती, पुणे ते मिरज आणि मिरज ते कोल्हापूर या स्थानकांदरम्यान तिकीट तपासणी अभियान राबविण्यात आले. ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत पुणे विभागामध्ये 29 हजार 353 प्रकरणांबाबत कारवाई करण्यात आली. यासाठी 1 कोटी 55 लाख रुपयांचा दंड आकारला आहे. त्यापैकी सुमारे 14 हजारांहून अधिक जणांवर विनातिकीट प्रवास करण्याबाबत कारवाई करण्यात आली. संबंधितांना 78 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
पुणे विभागाकडून एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत सुमारे 2 लाख 49 हजार प्रकरणांसाठी 13 करोड 10 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. त्यापैकी तिकीट तपासणीमध्ये सुमारे 1 लाख 14 हजार विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. संबंधितांना 6 करोड 51 लाख रुपयांचा दंड आकारला. मागील या कालावधीमध्ये झालेल्या तपासणीमध्ये 1 लाख 1 हजार 700 जणांना विनातिकीट प्रवास करताना कारवाई केली. त्यांना 5 करोड 69 लाख रुपयांचा दंड आकारला. ही कारवाई वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा, मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन आणि सहायक वाणिज्य प्रबंधक एस. एन. सुभाष यांच्या नेतृत्वाखाली केली.