नवी दिल्ली – कौटुंबीक क्रीडा पार्श्वभूमी लाभलेल्या काशिलिंग आडकेचा जन्म 18 डिसेंबर 1992 रोजी सांगली जिल्ह्यातील कासेगाव या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील रामचंद्र हे माजी कुस्तीपटू आणि शेतकरी होते. रामचंद्र यांना कुस्तीची खूप आवड होती. काशिलिंगनेही कुस्तीत कारकिर्दी करावी अशी त्याची नेहमीच इच्छा होती.
मात्र, काशिलिंगला कबड्डीमध्ये जास्त रस असल्याने त्याला कुस्तीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. एकदा त्याच्या वडिलांनी त्याला कबड्डी खेळताना पाहिले आणि काशिलिंगची प्रतिभा व खेळ खेळण्याची क्षमता पाहून त्यांनी काशिलिंगसाठी कुस्तीचा हट्ट सोडत कबड्डीमध्ये कारकिर्द करण्यासाठी प्रोत्साहीत केले.
वयाच्या 15 व्या वर्षी काशिलिंग आडकेने कबड्डी स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या कामगिरीने प्रभावित होऊन, त्याच्या स्थानिक कबड्डी क्लबने त्याला शिष्यवृत्ती देऊ केली आणि त्याला उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी आणि कबड्डीपटू म्हणून सुधारण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडली.
काशिलिंगचे काका सुनील आडके ज्यांनी भारत पेट्रोलिअय संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी काशिलिंगचे कबड्डीती कौशल्य आणि प्रतिभेला चालना देण्यासाठी मुंबईला घेऊन आले. काशीने चांगली कामगिरी करुनही भारत पेट्रोलियम संघासाठी त्याची निवड झाली नाही. व्यथित होऊन त्याने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र काही काळानंतर काशिलिंगची महिंद्रा संघात निवड झाली. त्याची चमकदार कामगिरी पाहता भारतीय क्रीडा प्राधिकरणाने काशिलिंगला व्यावसायिक प्रशिक्षणासाठी गुजरातला पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे काशीने जी कामगिरी केली त्याने त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.
काशिलिंगची प्रो कबड्डी लीग कारकीर्द
काशिलिंग अडकेने प्रो कबड्डी लीग कारकीर्दीची सुरुवात 2014 मध्ये केली. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात त्याला दबंग दिल्लीने 10 लाखांना विकत घेतले. या करारामुळे काशिलिंगचे आयुष्य बदलले. एक म्हणजे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणखी जवळ आला होता. दुसरे म्हणजे,दबंग दिल्लीसाठी दमकार कामगिरी करत काशीने काशीने राष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला.
काशिलिंग अडकेने प्रो कबड्डीमध्ये ज्या ज्या संघाचे प्रतिनिधीत्व केले त्या त्या संघासाठी त्याने दमदार कामगिरी केली. स्पर्धेच्या पहिल्या 4 हंगामात दबंग दिल्लीकडून सर्वाधिक गुण मिळवणार्या खेळाडूंमध्ये तो अव्वल स्थानी होता. तसेच स्पर्धेच्या दुसर्या हंगामात 114 गुण मिळवणार्या काशिलिंगला सर्वोत्तम चढाईपटू म्हणून गौरवण्यात आले होते.
स्पर्धेच्या 5व्या हंगामात काशिलिंगला यू मुंबाने आपल्या ताफ्यात दाखल केले. संघाचा विश्वास सार्थ ठरवत त्याने यू मुंबासाठी सर्वाधिक गुण मिळवले. पहिल्या पाच हंगामातील काशिलिंगची कामगिरी पाहून 6व्या हंगामात बंगळुरु बुल्सने त्याला 35 लाख रुपयांत करारबद्ध केले. या हंगामात त्याने 20 सामन्यांमध्ये 64 गुण मिळवले. मात्र स्पर्धेच्या 7व्या आणि 8व्या हंगामात त्याला कोणत्याही संघाने करारबद्ध न केल्याने गेली दोन हंगाम तो प्रो कबड्डीला मुकला आहे.
एकूण सामने – 92, एकूण गुण – 612, चढाईतील गुण – 561, बचावातील गुण – 51, एका सामन्यात सर्वाधिक गुण – 24