सध्या करोना व्हायरसमुळे जग हादरले आहे. रुग्णांची संख्या वीस लाखांवर पोचली असून मृतांचा आकडाही लाखाच्या वर गेला आहे. भारतातही रुग्णांची संख्या 11 ते 12 हजार झाली आहे. कोरोनामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब आणि मजुरांचे हाल होत असून त्यांना मदत करण्यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था, मंदिर देवस्थान, समाजसेवक, सेलिब्रिटी सरसावले आहेत. यात अभिनेत्री प्रियांका चोप्राचेही नाव घ्यावे लागेल. तिने या लढाईचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. कोरोनाबाबत ती जनजागृती मोहिमही करत आहे. गरजू लोकांना मदत करण्यासाठी ती सदैव तयार आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तिने एका ब्रॅंडबरोबर पार्टनरशीप करत मुलांना हेडफोन्स उपलब्ध करून दिले. व्हर्च्युअल क्लासरुममध्ये सहभागी होणाऱ्या मुलांना ती हेडफोन्स देत आहे. युवा सक्षमीकरण आणि शिक्षणात यश मिळवणे या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, असे प्रियांका म्हणते. व्हीडिओच्या शेवटी तिने चाहत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय प्रियांका आणि निक यांनी प्राइम मिनिस्टिर्स सिटिजन असिस्टंस आणि पीएम केअर्स फंड, यूनिसेफ, गूंजसह दहा चॅरिटीजला देणगी दिली आहे. अर्थात तिने देणगीची रक्कम सांगितली नाही.