कोल्हापूर – इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालय कोविड रुग्णांच्या उपचारासाठी कार्यान्वित करू. या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या नॉन कोव्हिड रुग्णांवर खासगी रुग्णालये, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मान्यताप्राप्त रुग्णालयांनी पुढे येऊन रुग्ण सेवा देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कोल्हापूरमधील सीपीआर कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी सीपीआरमधून संदर्भात केलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरू केले आहे. त्या प्रमाणेच इचलकरंजीतील खासगी रुग्णालयांनी नॉन कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कोव्हिडचा प्रादुर्भाव वाढल्यास परिसरातील 40 रुग्णालयांना उपचारासाठी टप्प्या-टप्प्याने समावेश करून घेतले जाईल. कोव्हिड विरोधात लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असेही, ते म्हणाले.