ऑनलाईन शिक्षणासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली – ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 45 मिनिटांचा तास असावा, अशी मर्यादा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज निश्‍चित केली. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 45 मिनिटांचे दोन तास, तर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 30 ते 45 मिनिटांच्या चार तासांना परवानगी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठीचे ऑनलाईन तास 30 मिनिटांपेक्षा अधिक नसावेत, असेही या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी स्क्रीनसमोर जास्ती काळ बसणे आरोग्याला अपायकारक ठरू शकते, अशी चिंता व्यक्‍त करण्यात आल्यामुळे ही मार्गदर्शक सूचना देण्यात आली आहे.

याशिवाय स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठीही शिक्षणाच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने जारी केल्या आहेत. करोनाच्या साथीमुळे जे स्थलांतरित कामगार आपापल्या मूळगावी परतले आहेत, त्यांच्या अपत्यांची नावे शाळांमधून कमी करण्यात येऊ नयेत. अशा स्थलांतरित कामगारांच्या मुलांची माहिती एकत्रित करण्यात यावी. त्यासाठी त्यांच्या पालकांशी मोबाईल, व्हॉट्‌स ऍप अथवा शेजाऱ्यांच्या माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न व्हावा. संपर्क होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरत्या संपर्कापासून दूर असे नोंदवण्याची सूचना प्रत्येक राज्यांना मंत्रालयाने केली आहे.

करोना विषाणूच्या साथीमुळे देशभरातील 240 दशलक्ष विद्यार्थ्यांच्या शालेय वेळापत्रकाला फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन सत्रांद्वारे अभ्यासक्रम शिकवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पर्यायी शिक्षण व्यवस्थेमध्ये आणखी बदल केले जातील, असे सूतोवाच केंद्रीय मनुष्यबळ मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.