न्यूयॉर्क – जागतिक शांततेसाठी तीन सदस्यांचा सहभाग असलेली एक समिती नियुक्त करावी, या शांतता समितीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटरेज यांचा सहभाग असावा, अशी शिफारस आपण संयुक्त राष्ट्राला करणार आहोत, असे मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रियाज मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी म्हटले आहे. जगभरातील युद्धांबाबत युद्धविराम आणि शांतता राखण्यासाठी किमान पाच वर्षे ही समिती कार्यरत राहू द्यावी, अशी शिफारसही आपण करणार असल्याचेही ओब्राडोर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मोदी, पोप फ्रान्सिस आणि ग्युटरेज यांच्या सहभागाच्या या समितीबाबतचा प्रस्ताव आपण लवकरच सादर करणार आहोत. या समितीला रशिया, अमेरिका आणि चीन या जगातील तीन महासत्ता नक्की राजी होतील. या नेत्यांचे म्हणणे हे तिन्ही देश नक्की मान्य करतील, अशी आशाही ओब्राडोर यांनी व्यक्त केली. अशी समिती नियुक्त केल्यामुळे सर्वत्र सुरू असलेले युद्ध थांबण्यास मदत होईल. युद्धविरामाची प्रक्रिया किमान 5 वर्षे तरी सुरू राहील. याकाळात जगभरातील युद्धग्रस्त देशांना आपल्या देशवासीयांना मदत करणे शक्य होईल. अशा प्रयत्नातून जगभर किमान पाच वर्षे तरी तणाव, हिंसा होणार नाही आणि शांतता राहू शकेल, असेही ओब्राडोर यांनी आपल्या वेबसाईचवर म्हटले आहे.
युद्धांमुळे निरपराधांचे जीव जातात आणि म्हणूनच शांततेसाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. युद्ध सुरू असलेल्या देशांनी ताबडतोब युद्ध थांबवावे. चर्चेला सुरुवात करावी आणि बळाचा वापर करू नये,या संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो ग्युटरेज यांच्या मताशी आपण सहमत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.