इंदापूर – लाकडी-निंबोडी जलसिंचन उपसा योजनेच्या 218.79 कोटीच्या निविदेस जलसंपदा विभागाने मंगळवारी (दि. 9) मंजुरी दिली. त्याबद्दल जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारचे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. या योजनेच्या कामास आता लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. 11) दिली.
लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेसाठी एकूण 348 कोटी रुपयांच्या कामांना जलसंपदा विभागाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. शिवसेना-भाजप सरकारने योजनेच्या विविध कामांची 218.79 कोटी रक्कमेची निविदा (टेंडर) प्रक्रिया शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर 2022) पासून सुरू केली होती. आता ही निविदा अंतिम झाल्याने येत्या काही दिवसांत लवकरच प्रत्यक्ष कामात सुरुवात होईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी 1995 ते 1999 मध्ये शिवसेना-भाजप युती शासनामध्ये मंत्री असताना कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या सूचनेनुसार लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर अखेर 2012 मध्ये या योजनेसाठी उजनी धरण पाणी वापर आराखड्यामध्ये 0.86 टी.एम.सी. पाणी आरक्षित ठेवण्यात हर्षवर्धन पाटील यांना यश आले. या योजनेत इंदापूर व बारामती तालुक्यातील एकूण 7250 हेक्टर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे.
योजनेत इंदापूर, बारामतीला फायदा
इंदापूर तालुक्यातील सुमारे 4337 हेक्टर तर बारामती तालुक्यातील सुमारे 2913 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी, शेटफळगढे, शिंदेवाडी, म्हसोबाचीवाडी, काझड, लाकडी, निंबोडी, निरगुडे, पिंपळे, अकोले या 10 गावांचा तर बारामती तालुक्यातील जैनवाडी, पारवडी, रुई, सावळ, वंजारवाडी, कण्हेरी, जळोची या 7 गावांचा समावेश आहे.
विविध कामे होणार
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी लाकडी-निंबोडी योजनेची निविदा काढून प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने भेट घेऊन पाठपुरावा केला. आता मंजूर निविदा 218.79 कोटीच्या निधीमधून पंपगृह टप्पा 1 व 2, वितरण कुंड 1 व 2, बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे बांधकाम आदी विविध कामे केली जाणार असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.