नवी दिल्ली – छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. कांकेरच्या पोलीस अधीक्षक इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, जिल्हा राखीव रक्षक आणि सीमा सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात असताना कोयलीबेडा भागातील जंगलात ही चकमक झाली. चकमकीच्या ठिकाणाहून आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि दोन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत आणि कारवाई अजूनही सुरू आहे.
कोयलीबेडा भाग हा दुर्गम असून, इथे घनदाट जंगल आहे. या जंगलात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांनी आपले तळ उभे केले आहेत. काही ठिकाणी नक्षलवादी शस्त्रांच्या वापराचा सरावही याच भागात करताना दिसतात.
पोलिसांना त्यांच्या माहितगारांकडून माहिती मिळाल्यानंतर, सुरक्षा दलांसह पोलिस या भागात संयुक्त मोहिम राबवतात. अशीच एक मोहिम राबवताना सुरक्षा दलांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला असता प्रत्त्युत्तराच्या कारवाईत तीन नक्षलवादी प्राणाला मुकले.
हुरतराई जंगलात रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. मात्र, पोलिसांनी शस्त्रे जप्त केल्याची पुष्टी केलेली नाही. यासोबतच अनेक नक्षलवादी जखमी झाल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.