उपविभागीय अधिकारी संजय तेली : भाविकांना सर्व सुविधा मिळणार
राजगुरूनगर-महाशिवरात्री निमित्ताने ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे (दि.21) होणाऱ्या यात्रेनिमित्ताने प्रशासनाची जय्यद तयारी सुरू झाली असून भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी (प्रांत) संजय तेली यांनी दिली.
ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे महाशिवरात्री निमित्ताने होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर येथे प्रांतकार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रांताधिकारी संजय तेली यांच्यासह भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, मधुकर गवांदे, रत्नाकर कोडिलकर पुरुषोत्तम गवांदे, विकास ढगे, नायब तहसीलदार मालती धोत्रे, लतादेवी वाजे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी एन. एस. कांबळे, एम. बी. कौदरे, भीमाशंकर अभयारण्य वन संरक्षक डी. आर. झगडे, शाखा अभियंता आर. डी. जाधव, व्ही. डी. डाके, महावितरणचे एन. एम. घाडुळे, डी. एस. जोनवाल, एम. एन. कडू, राजगुरूनगर आगार व्यवस्थापक रमेश हांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एम. एस. भिगारदीवे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, डॉ. एस. एस. ढोकळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत महाशिवरात्रीला ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथे सुमारे दोन लाख भाविक येण्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला असून त्यानुसार त्यांना अत्यावश्यक असलेल्या सुविधा येथे पुरविण्यासाठी तयारी केली आहे. याबरोबरच भीमाशंकरला जाणाऱ्या मंचर घोडेगाव मार्गावरील पोखरी व डिंभे घाटातील रस्त्याची दुरुस्ती, खेड तालुक्यातील वाडामार्गे तिफनवाडी ते वाळद रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे.
वाडाकारकुडीमार्गे भीमाशंकर येथे जाण्यासाठी जड-अवजड वाहनांना बंदी केली आहे. मंदोशी घाटाची वाहतूक बंद आहे, त्यामुळे यामार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी असल्याचे फलक ठिकठिकाणी लावले जाणार आहेत. देवस्थान परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने दर्शनबारीचे नियोजन करण्यात आले आहे. तीन टप्पे बनवून त्यानुसार दर्शनबारी करून भाविकांना कमी वेळात दर्शन घेण्यासाठी नियोजन केले आहे.
येथे येणाऱ्या भाविकाला पाणी, शौचालये, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाची 10 पथके याकाळात कार्यरत असणार असून 2 रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. याबरोबरच वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. वनविभागाच्या माध्यमातून अभयारण्य व भीमाशंकर जंगलात स्वच्छता व अनुचित प्रकार होऊ नयेत यासाठी खास यंत्रणा उभारण्यात आली आहे. पूर्णतः प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे.
तिकिट दाखवल्यास मंदिरापर्यंत मोफत प्रवास
भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांसाठी तीन ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंगपासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी 20 एसटी मिनी बस व देवस्थानच्या 10 मिनी बस ठेवण्यात आल्या आहेत. शिवाय पुण्यावरून भीमाशंकरला आलेल्या भाविकांसाठी एसटीचे तिकीट दाखल्यास पार्किंग ते मंदिरापर्यंत मोफत प्रवास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
450 पोलीस राहणार तैनात
महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खेड पोलीस ठाण्याची 6 व घोडेगाव पोलिसांची 5 पथके कार्यरत असणार आहेत. त्यांच्यासह 450 पोलीस याठिकाणी बंदोबस्त ठेवणार आहेत. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी भीमाशंकर मार्गावर पोलीस करडी नजर ठेवणार असून एखादे वाहन बंद पडल्यास त्याला बाजूल करण्यासाठी क्रेनची व्यवस्था केली आहे.