42 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा मिळणार लाभ

विनोद मोहिते
वाळवा तालुक्‍यातील साडेनऊ हजार पूरग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश

इस्लामपूर  – वाळवा तालुक्‍यातील साडेनऊ हजार पूरग्रस्त शेतकऱ्यांना 42 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश प्रसारित केल्याने पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दोन लाख रूपयांपर्यंत थकलेले कर्ज माफीची राज्य भरातील कार्यवाही अंतिम टप्प्यात आल्याने महापूरग्रस्त शेती कर्ज माफीची अंमलबजावणी कधी होणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले होते.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला वाळवा तालुक्‍यात कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या महापुराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. ऊस, केळी, हळद या पिकाची वाट लागली होती. दहा-बारा दिवस ही पिके पाण्याखाली गेली होती. ज्याठिकाणी महापुराचा फटका बसला नाही. तेथील खरीप पिके अतिवृष्टीमुळे कुजली.

सततच्या पावसाने ऊसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाला. ऊसाचे मोठे नुकसान झाले महापूर बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करताना बुडालेले पिकावरील कर्जाच्या माफी घोषणा अध्यादेशाद्वारे तत्कालीन सरकारने केली होती. कृषी विभागाने अतिवृष्टी बाधित शेतीचे पंचनामे तसेच बुडालेल्या पिकांचे पंचनामे यासाठी सलग महिनाभर मोहीम राबविली. त्रुटींची पूर्तता केली.

सहाय्यक निबंधक यांनी सोसायट्यांच्या कर्जाची खातरजमा करून पीक कर्जाची छाननी करून याद्या तयार केल्या. याद्या सहाय्यक निबंधक यांनी जिल्हा उपनिबंधकाकडे व जिल्हा बॅंकेकडे सादर केल्या आहेत. ज्यांचे कर्ज नाही त्यांना तिप्पट दराने भरपाई जमा झाली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर महापुराची कर्जमाफीची रक्कम तात्काळ जमा होईल, अशी आशा होती. परंतु पूरग्रस्त कर्जमाफी घोषणेची पूर्तता होण्याआधीच दोन लाख पर्यंतच्या थकीत असणाऱ्या कर्जमाफीची राज्य भरातील घोषणा झाली.

तिची पूर्तताही आता अंतिम टप्यात आली आहे. त्यामुळे पूरग्रस्त शेतकरी वर्गात अस्वस्थता होती. पूरग्रत कर्ज यादीत नाव असल्याने मुख्य कर्जमाफी मिळणार नाही आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफीची हालचाल संथ असल्याने यातच यावर्षी भरीतभर म्हणून साखर कारखाने उशिरा सुरू झाले आहेत. बदलत्या वातावरणामुळे तोडणीत सातत्य नाही.

एफआरपीचे भिजत घोंगडे कायम आहे. महापुराच्या फटक्‍याने पशुधन घटले आहे. सध्या सुरू असणाऱ्या शेती कामासाठी पैसे नाहीत. नवीन कर्ज मिळत नाही. अशा दुहेरी अडचणीत शेतकरी सापडला होता. कृष्णा काठावरील शेतकरी या महापुराच्या शेती कर्जमाफीची घोषणा कधी होईल याकडे डोळे लावून बसला होता. नुकताच राज्य सरकारने याबाबत आदेश काढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.