जीव वाचवायला पळाला आणि जीवच गमावला

शिक्रापुरात दोन्ही पुलांच्यामध्ये पडून चालकाचा मृत्यू

शिक्रापूर – येथे बस व कार यांच्यात झालेल्या अपघातानंतर नागरिकांच्या मारहाणीच्या भीतीने जीव वाचविण्यासाठी पळालेल्या बस चालकाचा पुणे-नगर महामार्गावरील दोन्ही पुलांच्या मध्यभागातून खाली पडल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 15) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. तर बसमधील दुसरा चालक जखमी झाला आहे.

चालक भागवत रामभाऊ निंबोळकर (सध्या रा. हडपसर, पुणे मूळ रा. उमाळी ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे मृत झालेल्या चालकाचे नाव आहे. निलेश जगन्नाथ चव्हाण (रा. बोराखेडी, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे जखमी झालेल्या दुसऱ्या चालकाचे नाव आहे. तर योगेश निना शेळके रा. हरणखेड ता. मलकापूर जि. बुलढाणा यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, शिक्रापूर (ता. शिरूर) येथून पुणे ते बुलढाणा येथे साईराम ट्रान्सपोर्टची बस (एमएच 19 वाय 9909) चालक निलेश चव्हाण व भागवत निंबोळकर शुक्रवारी (दि. 14) रात्री निघाले होते.

शिक्रापूर जवळ रिलायन्स पेट्रोलपंप जवळ समोर आलेल्या कारला (एमएच 12 क्‍यूवाय 9595) बसची धडक बसली आणि बस दुभाजकावर आदळली. त्यात बसमधील एक चालक चव्हाण जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. तर उपस्थितांकडून मारहाण होईल या भीतीने निंबोळकर पळू लागला, त्यावेळी तो कोठे गेला हे कोणालाही समजले नाही. त्यांनतर बसच्या वाहकाने ट्रान्सपोर्टच्या मालकाला फोन करून घडलेला प्रकार सांगत निंबोळकर हे बस जवळ नाही, त्यामुळे चालक पाठवून देण्यास सांगितले त्यानंतर दुसरा चालक आल्यानंतर बस बाजूला घेण्यात आली.

त्यांनतर देखील बसवरील चालक भागवत निंबोळकर यांचा शोध लागला नाही. तर सकाळच्या सुमारास शिक्रापूर येथील दोन्ही पुलांच्या मध्यभागी एका व्यक्‍तीचा मृतदेह पडलेला दिसून आले. तर ही व्यक्‍ती हा रात्रीच्या वेळी पुलावरून खाली पडलेला असावा असा अंदाज सर्वांनी वर्तविला त्यांनतर बसच्या वाहकांसह काहींनी त्या ठिकाणी धाव घेतली असता तेथे बसवरील दुसरा चालक भागवत निंबोळकर हे मयत अवस्थेत पडलेले असल्याचे आढळून आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट करीत आहे.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.