IPL 2024 (GT vs PBKS Match 17,Shashank Singh & Preity Zinta) – आयपीएल 2024 च्या हंगामातील 17 व्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध खेळताना पंजाब किंग्सच्या शशांक सिंगने अवघ्या 29 चेंडूंमध्ये 61 धावांची तुफान खेळी करत सर्वांनाच थक्क केले. शशांकच्या सुपर इनिंगमुळे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टायटन्सच्या 199 धावांचा पाठलाग करणे पंजाब किंग्ससाठी सोपे गेले. विशेष म्हणजे शशांकला क्रिकेट खेळण्याचे बाळकडू त्याच्या भारतीय प्रशासकीय सेवेत (आयपीएस) असणाऱ्या वडीलांनी बालवयातच दिले.
खरंतर याच शशांक सिंगचे नाव आयपीएलच्या मेगा लिलावाच्या वेळी सुद्धा चर्चेत आले होते. पंजाब किंग्सने दुसराच खेळाडू समजून शशांकला आपल्या संघासाठी खरेदी केल्याची जोरदार चर्चा तेव्हाही रंगली होती. अनेक ऑनलाईन पोस्ट्समधून प्रीती झिंटाला कसा हा व्यवहार तोट्याचा वाटतोय, पश्चाताप होतोय असेही सांगण्यात आले होते.
खरंतर पंजाबकडून अशाप्रकारची कोणतीही चूक झाल्याचे मान्य करण्यात आले नव्हतेच पण समजा अशा चर्चा झाल्या असल्या तरी शशांकने आपल्या तुफान खेळीने आता सर्वांचीच तोंडे बंद केली आहेत. पंजाबची मालकीण प्रीती झिंटा सुद्धा त्याच्या या खेळीमुळे खूप खुश झाली असून तिने या स्टार बॅट्समनचे कौतुक करत एक सुंदर पोस्ट केली आहे.
शशांकच्या जिद्दीचे कौतुक करताना प्रीतीने लिहिले की, “लिलावाच्या वेळी आलेल्या चुकीच्या चर्चांवर उत्तर देण्यासाठी आजचा दिवस बेस्ट आहे असे मला वाटते, अशा परिस्थितीत कदाचित कुणाचाही आत्मविश्वास खचून गेला असता, दबावामुळे खेळण्याची इच्छा सुद्धा उरली नसती पण शशांक त्यांच्यापैकी एक नाही. तो खास आहे. फक्त एक खेळाडू म्हणून नव्हे तर त्याच्या सकारात्मक वृत्तीमुळे आणि अविश्वसनीय जिद्दीमुळे तो सगळ्यांपेक्षा वेगळा ठरतो. लोकांच्या कमेंट्स, मीम्स, चेष्टा त्याने मस्करीतच घेतल्या, त्याने स्वतःला पाठिंबा दिला आणि तो काय कमाल करू शकतो हे आता त्याने दाखवून दिले आहे. मला त्याचं कौतुक आहेच व त्याहीपेक्षा जास्त त्याचा आदर आहे, असेही ती म्हणाली.
“मी प्रथम आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स जॉईन केले, त्यानंतर 2 वर्षे राजस्थानमध्ये राहिलो. मला तीन वर्षे प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही. प्रत्येक मोसमात जवळपास 40-45 दिवस न खेळता बसायचो. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती स्वतःलाच प्रश्न विचारू लागते. एवढ्या उच्च पातळीवर खेळण्याची माझी लायकी नाही, अशी शंकाही मला आली. परंतू संधी मिळाली आणि तिचे सोनं करण्याचा प्रयत्न केला.”
– शशांक सिंग, पंजाबचा अष्टपैलू खेळाडू
शशांकची कारकिर्द
प्रथम श्रेणी : सामने-21, धावा- 858, विकेट्स- 12
लिस्ट ए : सामने-30, धावा- 986, विकेट्स- 33
टी-20 : सामने- 59, धावा- 815, विकेट्स- 15