IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : रोमहर्षक सामन्यात पंजाबचा गुजरातवर विजय; शशांक-आशुतोष ठरले गेमचेंजर…

GT vs PBKS Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 स्पर्धेत 17 वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळला गेला. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या आणि रंगतदार झालेल्या सामन्यात पंजाबनं गुजरात टायटन्सवर 3 विकेट्सने विजय मिळवला आहे. गुजरातने पंजाबला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 19.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा हे पंजाबच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
शशांक सिंगने 29 चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 61 धावांची नाबाद खेळी करत पंजाब किंग्जला गुजरात टायटन्सवर विजय मिळवून दिला. याव्यतिरिक्त जॉनी बेयरस्टोनं 22 धावा, प्रभासिमरन सिंगनं 35, सिकंदर रझानं 15, जितेश शर्मानं 16 आणि आशुतोष शर्मानं 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या आणि पंजाबच्या विजयात हातभार लावला.
आयपीएलच्या चालू मोसमातील चार सामन्यांमधला पंजाबचा हा दुसरा विजय आहे. पंजाबला यापूर्वी दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले होते, मात्र संघाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुजरातचा घरच्या मैदानावर पराभव केला.
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्जने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलच्या नाबाद 89 धावा आणि राहुल तेवतियाच्या नाबाद 23 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 199 धावसंख्येपर्यत मजल मारली होती.
IPL 2024 (GT vs PBKS Match 17) : गिलची दमदार खेळी, गुजरातचं पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्य…
गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने 48 चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची खेळी केली. गिलचे शतक हुकले असले तरी त्याने आपल्या कामगिरीने संघाला सावरले. गिलच्या या खेळीच्या जोरावर गुजरातने 199 धावा केल्या. गिल या मोसमात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
राहुल तेवतियाने अवघ्या आठ चेंडूत 23 धावांची नाबाद खेळी खेळली. तेवतियाने 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. याआधी साई सुदर्शनने 19 चेंडूत 6 चौकारसह 33 धावांची तर केन विल्यमसनने 22 चेंडूत 4 चौकारासह 26 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त ऋद्धिमान साहा 13 चेंडूत 11 धावा करून तर विजय शंकर 10 चेंडूत आठ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंजाबकडून गोलंदाजीत वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने चार षटकांत 44 धावांत दोन बळी घेतले, तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. हरप्रीतने 4 षटकात 33 तर हर्षलने 44 धावा दिल्या.





