नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी जंतरमंतर येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. देशाच्या अन्य भागातही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने असेच उपोषण करण्यात आले.
केवळ भारतातच नव्हे तर विदेशातही केजरीवाल समर्थकांनी असे उपोेषण केले. बोस्टनमधील हार्वर्ड स्क्वेअर, लॉस एंजेलिसमधील हॉलीवूड साइन, वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाबाहेर, न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर आणि टोरंटो, लंडन आणि मेलबर्न यासह इतर देशांमध्येही भारतीयांकडून अशीच निदर्शने केली जात आहेत, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.
आप शासित पंजाबमधील मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या खटकर कलान या गावी सामूहिक उपोषणात भाग घेतला. दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल, उपसभापती राखी बिला, मंत्री आतिशी, गोपाल राय आणि इम्रान हुसैन यांच्यासह अनेक वरिष्ठ आप नेते राष्ट्रीय राजधानीतील जंतरमंतर येथे सकाळी ११ वाजल्यापासून दिवसभराच्या ‘सामुहिक उपवास’मध्ये सहभागी झाले होते.
दिल्ली युनिटचे निमंत्रक गोपाल राय यांनी लोकांना केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले. दिल्ली अबकारी धोरणाशी संबंधित घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना केलेली अटक हा भाजपच्या ‘आप’ला संपवण्याच्या कटाचा एक भाग असल्याचा आरोप त्यांनी केला.