शहर, उपनगरांतील मंदिरांत भाविकांची संख्या रोडावली
पुणे – ‘एखादे संकट आले की, देवाचा धावा करण्यासाठी आपण मंदिरात जातो. मात्र, आता ही प्रार्थना घरातूनच करावी लागणार आहे. कारण करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख देवस्थानांनी आपली सर्व मंदिरे नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या धास्तीने नेहमी गजबजलेली असणाऱ्या मंदिरात भाविकांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत होते. प्रमुख मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या सुमारे 40 ते 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे मंदिर प्रशासनांकडून सांगण्यात आले. मात्र, तरीही धार्मिक स्थळे बंद करण्याबाबत कोणताही विचार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, सोमवारी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, शहरातील प्रमुख देवस्थानांनी आपली सर्व मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
नियमितपणे अथवा सुट्टीदिवशी जिल्ह्यातून नागरिक खरेदीनिमित्त अथवा अन्य कारणांसाठी शहरात येतात. यावेळी अनेकजण आवर्जून मंदिरात दर्शनासाठी येतात, अशावेळी नागरिकांचा एकमेकांशी संपर्क आल्यास करोनाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतल्याचे मंदिर प्रशसनांकडून सांगण्यात आले. इतरधर्मीच्या प्रार्थनास्थळांमध्ये देखील अशाच प्रकारची स्थिती असल्याचे पहायला मिळाले.
तुळशीबाग राम मंदिरातील रामनवमी उत्सव रद्द
श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने तुळशीबाग राम मंदिर येथे दरवर्षी गुढीपाडवा ते राम नवमीदरम्यान रामनवमी उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात गायन, प्रवचन, दररोजचे कीर्तन असे कार्यकम होतात. यंदा हा उत्सव 25 एप्रिल ते 2 मे दरम्यान आयोजित केला होता. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता हा उत्सव रद्द केल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
धर्मादाय आयुक्तांनी केले स्वच्छतेचे आवाहन
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्वच धार्मिक स्थळांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. देवस्थान परिसरात तसेच चर्च, मशीद, अग्यारी, गुरुद्वारा, बौद्ध विहार यासारख्या सर्वच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी औषध फवारणी करावी. तेथील परिसर स्वच्छ ठेवावा. धार्मिक स्थळांच्या प्रवेशद्वारावर घ्यावयाच्या काळजीसंबंधिचा फलक लावावा. भाविकांसाठी सॅनिटायझर, साबण आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना सह-धर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख यांनी दिल्या आहेत.
ही मंदिरे राहणार बंद
– कसबा गणपती मंदिर
– श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर
– श्रीमंत दगदूशेठ हलवाई गणपती मंदिर
– पर्वती देवस्थान
– सारसबाग गणपती मंदिर
– महालक्ष्मी मंदिर
– तुळशीबाग राममंदिर
– सद्गुरु साईसाथ कृपा मठ, स्वारगेट-सातारा रस्ता
सुरक्षेच्या कारणास्तव श्री देवदेवेश्वर संस्थानची सर्व मंदिरे तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय संस्थान पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये पर्वती येथील देवस्थान, सारसबाग येथील गणपती मंदिर, कोथरूड येथील मृत्युंजयेश्वर मंदिर यांचा समावेश आहे.
– सुधीर पंडित, विश्वस्त
करोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंगळवारपासून जनहितार्थ दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि श्रीमती लक्ष्मीबाई दत्त मंदिर हे दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मंदिर सुरू करण्यात येईल. तोपर्यंत भाविकांनी मंदिर परिसरात न येता, ऑनलाइन पद्धतीने दर्शन घावे.
– अशोक गोडसे, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट