मुंबई – को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियन आयोजित कोंकण मर्कंटाईल को-ऑप. बॅंक लिमिटेड पुरस्कृत आंतर सहकारी बॅंक बुद्धिबळ स्पर्धेत दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा प्रवीण सावर्डेकरने विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा को-ऑपरेटिव्ह बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व खासदार आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे यांच्या उपस्थितीत खेळविण्यात आली.
ही बुद्धिबळ स्पर्धा बाद व साखळी पद्धतीने खेळविण्यात आली होती. रंगतदार झालेल्या शेवटच्या साखळीच्या सामन्यात सावर्डेकरने ग्रेटर को-ऑपरेटिव्ह बॅंकेचा सुशांत पालकरचा पराभव करून 6 गुण मिळवून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. प्रवीण सावर्डेकर यांना बुद्धिबळाचे (फिडे) मानांकन इलो रेटिंग 1476 आहे. ते बुद्धिबळ प्रशिक्षकही आहेत. ग्रेटर को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सुशांत पालकरने चार गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला. मुंबई मध्यवर्ती जिल्हा को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या विलास चौधरीने दोन गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकाविला.
बक्षीस समारंभ कोंकण मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे कार्याध्यक्ष असीफ गुलाम महंमद दादन व को-ऑप. बॅंक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व खासदार आनंदराव अडसूळ यांच्या हस्ते झाले. यावेळी युनियनचे उपाध्यक्ष नंदकुमार रेगे, यदुवीर पुत्रन, हाशम धामसकर, प्रकाश वाघमारे, संयुक्त चिटणीस नारायण बोरुडे, मनोहर दरेकर व सहखजिनदार जनार्दन मोरे आदि उपस्थित होते.