पुणे-अजून बाळंतीण झाली नाही आणि हे नाव ठेवून मोकळे, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सणसणीत टोला लगावला आहे. भाजपने कधीच सुशांत सिंगने आत्महत्या केली की हत्या झाली हे विचारले नव्हते, असंही ते म्हणाले. ते सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दौऱ्यादरम्यान त्यांनी हा टोला लगावला आहे.
एम्सचा बाबतीत जो रिपोर्ट येईल तो आम्ही स्वीकारणारच आहोत. आणि अद्याप सीबीआय रिपोर्ट जाहीर होणे बाकी आहे. पण गृहमंत्री अनिल देशमुखांना एवढी इतकी घाई का आहे? असा सवालही त्यांंनी निर्माण केला.
अनिल देशमुखांनी महाराष्ट्र पोलिसांची बदनामी केली त्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, गुप्तेश्वर पांडेंनी कुठून उभं राहावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. आणि अद्याप त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. मात्र, राज्यातला कोविडचा प्रश्न व्यवस्थितपणे हाताळता आलेला नाही. तसेच कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, अशी टीका त्यांनी केली.