नवी दिल्ली- करोनाच्या संदर्भात रोज नवनवे दावे केले जातात. आता अशाच एका दाव्यानुसार हा विषाणू नउ तास तुमच्या त्वचेला चिकटून राहतो असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, फेसमास्कच्या संदर्भातही दावा करण्यात आला आहे. साधा मास्क घालणाऱ्या त्रासदायक वाटत असला तरी तो तुमच्या शरीराला होणाऱ्या ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करत नाही असेही सांगण्यात आले आहे.
कोविड जर तुमच्या त्वचेवर चिकटला आणि त्याला हटवण्यात आले नाही, तर साधारणपणे 9 तास तो आहे तेथेच राहतो. त्यामुळे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी हातांच्या स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे असे आवाहन वारंवार केले जात आहे.
यासंदर्भात एक प्रयोगही करण्यात आला. त्यात एका स्वयंसेवकाच्या त्वचेवर एन्फ्लूएंजा ए चा विषाणू दोन तासांपेक्षा कमी अवधी जिवंत राहीला. मात्र कोविड 9 तास जिवंत होता. या दोन्ही विषाणूंवर सॅनिटायझर टाकण्यात आल्यावर मात्र ते पंधरा सेकंदात निष्क्रिय झाले.
संबंधित सॅनिटायझरमध्ये 80 टक्के अल्कोहोल होते. अर्थात सॅनिटायझरचा वापर किमान 20 सेकंद केला गेला पाहिजे, असा सल्लाही दिला जात असला तरी संबंधित विषाणू केवळ पंधरा सेकंदात निष्प्रभ झाल्याचे आढळून आले आहे.