बीड – विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना न दिल्याने त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. समर्थकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी दरेकर यांच्याविरोधात घोषणा दिल्या.
भाजपनेते प्रवीण दरेकर हे सध्या बीड दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान बीड-उस्मानाबाद सीमेवर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवत मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. पंकजा मुंडे यांना भाजपने डावलल्याने बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळतोय.
याआधी देखील विधानपरिषदेची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले होते. औरंगाबादेत पंकजा मुंडे समर्थक भाजप कार्यालयावर चालून जात पंकजा नाही तर भाजपही नाही, अशा घोषणा दिल्या होत्या. इतकंच नाही तर, कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाही दिल्या होत्या.
यावेळी कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यालयावर दगडफेकही करण्यात आली होती. या दगफेकीत कार्यालयाचे नुकसान झाले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं होतं.