वंदना बर्वे
नवी दिल्ली – पश्चिम बंगालचा अवघड गड जिंकल्यावर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याकडून सर्वच राजकीय पक्षाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातही प्रशांत किशोर यांनी काल कॉंग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मात्र ते लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजधानीत रंगत आहे.
महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हा कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधीदेखील उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी आगामी निवडणूकच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रीय राजकारणात सक्रिय सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक पंजाबमधील लढाई किंवा पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांबद्दल नव्हती, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकांविषयी होती. या बैठकीत कॉंग्रेसने काही मोठ्या योजना आखल्याचेही सूत्रांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका पक्षाला हवी आहे जेणेकरून पीके कॉंग्रेसला या निर्णायक लढाईसाठी तयार करु शकतील.
प्रशांत किशोर यांनी 2021मध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या विजयासाठी योजना आखत ती यशस्वी करून दाखविली. आता प्रशांत किशोर हे अमरिंदर यांचे मुख्य सल्लागार आहेत आणि तेही अवघ्या एक रुपयांच्या पगारावर. पुढच्या वर्षी पंजाबमध्ये निवडणुक आहेत. अशा परिस्थितीत त्यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी मोठ्या दिलाशाची बाब आहे.
यूपीच्या निवडणुकीसंदर्भात प्रियांका गांधीही सक्रिय झाल्या आहेत. सोमवारीच त्यांनी उत्तर प्रदेशातील कॉंग्रेस नेत्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. दरम्यान राहुल-प्रियंकांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या आहेत की, यूपी निवडणुकीत प्रशांत किशोर यांची मोठी भूमिका असू शकते आणि हे लक्षात घेऊन कॉंग्रेस आपला खेळ आराखडा तयार करत आहे, अशी शक्यता आहे.