लखनऊ – अल कायदाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपांवरून उत्तर प्रदेश दहशतवाद प्रतिबंधक पथकाने बुधवारी तीन जणांना अटक केली.
महंमद मुस्ताकीन (44), महममद मोईद (29) आणि शकील अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी एटीएसने केलेल्या चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आहे.
मिन्हाज अहमद आणि मसीरूद्दिन या दोघांना लखनौच्या उपनगरांधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून एका जिवंत कुकर बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला होता. राज्यातील वेगवेगळ्या शहरामध्ये स्वातंत्र्य दिनाला स्फोट घडवण्याचा कट त्यांनी आखला होता, असे एटीएसने म्हटले आहे.
दरम्यान, या अतिरेक्यांना अटक केल्यानंतर मथुरा आणि हल्ल्याचा कट रचलेल्या शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. युमुना द्रुतगती मार्ग, आग्रा दिल्ली महामार्ग तसेच गर्दी असणारी वृंदावन, गोवर्धन आणि बनारस अशा तीर्थस्थळांवर संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.