श्रीनगर – जम्मू-काश्मीरात बुधवारी सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाचे सदस्य असणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये पाकिस्तानी नागरिक असणाऱ्या तोयबाच्या म्होरक्याचाही समावेश आहे. त्यामुळे संबंधित घडामोडीकडे सुरक्षा दलांचे मोठे यश म्हणून पाहिले जात आहे.
पुलवामामध्ये दहशतवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानंतर सुरक्षा जवानांनी मंगळवारी रात्री विशेष मोहीम हाती घेतली. दहशतवादी दडलेल्या ठिकाणाला सुरक्षा जवानांनी घेरले. त्या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
शरण येण्याचे आवाहन फेटाळत दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. खूप रात्र झाल्यानंतर काही काळ चकमक थांबली. अंधाराचा फायदा उठवून दहशतवादी पलायनाचा प्रयत्न करत होते. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे ते निसटू शकले नाहीत.
पहाटेच्या सुमारास दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा चकमक झडली. त्यामध्ये तिन्ही दहशतवादी मारले गेले. त्यामध्ये तोयबाचा पाकिस्तानी म्होरक्या ऐजाझ उर्फ अबू हुरैरा याचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. तरूणांची तोयबामध्ये भरती करण्यात तो सामील होता. त्याशिवाय, विविध दहशतवादी हल्ले घडवण्यातही त्याचा हात होता.