मुस्लीम ब्रदरहूडचे सरकारतर्फे विसर्जन
पॅरिस, ता. 29 – मुस्लीम ब्रदरहूड या इजिप्तमधील धर्मवेड्या संघटनेचे सरकारतर्फे विसर्जन करण्यात आल्याचे वृत्त कैरो नभोवाणीवरून सांगण्यात आले. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला असून या संघटनेच्या घातपाती गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया उजेडात आल्या आहेत असेही सांगण्यात आले.
मुस्लीम ब्रदरहूडचे 600 लोक पकडले
कैरो – इजिप्शीयन प्रजासत्ताकाचे अध्यक्ष ज. नगीब यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा येथे आज पसरल्या आहेत. पंतप्रधान नासीर यांच्या खुनाचा प्रयत्न झाल्यानंतर मुस्लीम ब्रदरहूड संघटनेच्या लोकांची धरपकड चालू असून आजवर 600 लोकांना अटक करण्यात आली आहे. या संघटनेचे प्रमुख ओडिबी यांचे काय होणार हे कळत नाही. तथापि, मुस्लीम ब्रदरहूड संघटनेतील दहशतवादाचे तेच प्रेरक आहेत असे सांगण्यात येते.
इराणचे माजी परराष्ट्रमंत्री हुसेन फतेमी फाशी जाणार
तेहरान – इराणचे माजी परराष्ट्रमंत्री हुसेन फतेमी अखेर फाशी जाणार असे दिसते; कारण लष्करी अपील कोर्टाने त्यांची फाशीची सजा कायम केली आहे. हुसेन फतेमी हे मुसादिकच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री होते. इतर 12 लष्करी अधिकाऱ्यांच्या देहान्त सजाही कायम करण्यात आल्या असून त्यात चार कर्नल व दोन मेजर आहेत.
गोसंवर्धन दिनानिमित्त ना. हिरे यांची नभोवाणी
मुंबई – आज गोसंवर्धन दिनानिमित्त महसूलमंत्री ना. हिरे यांचे नभोवाणीवर भाषण झाले. गुरांची उपयुक्तता लक्षात घेऊन जनता आणि सरकारचे सहकार्य वाढेल आणि जनावरांची उत्तम निपज होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. गुरांच्या संरक्षणासंबंधी सरकारने केलेल्या कायद्याचा त्यांनी आढावा घेतला. मुंबई राज्यात गाई आदी गुरांची संख्या 160 लाख असल्याचे ते बोलले.