दखल : महिलांविषयी पूर्वग्रहाचे जाळे विज्ञान क्षेत्रातही!

-डॉ. ऋतु सारस्वत

महिलांची जैविक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते, असे विचार चार्लस डार्विन यांनीही मांडले होते; परंतु या पूर्वग्रहामुळेच विज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना फार मोठी वाटचाल करता आली नाही. विज्ञानाचे नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अवघी 3.29 टक्‍के आहे. हा सामाजिक आणि सांस्कृतिक पूर्वग्रहाचा परिणाम आहे या पार्श्‍वभूमीवर यावर्षी रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक दोन महिला शास्त्रज्ञांना मिळणे महिलांचा आत्मविश्‍वास वाढविणारे आहे.

इमॅन्युएल शार्पेंतिए आणि जेनिफर डाउडना या दोन महिला शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक नुकतेच देण्यात आले. महिला शास्त्रज्ञांसाठी ही खरोखर आनंदाची आणि समाधानाची घटना आहे. कारण 1903 मध्ये मेरी क्‍यूरी यांनी नोबेल पटकावल्यापासून आतापर्यंत महिलांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी मजल मारली असली, तरी नोबेल पारितोषिकांमध्ये त्यांची हिस्सेदारी तुलनेने कमीच राहिली.

नोबेलमध्ये महिला शास्त्रज्ञांची हिस्सेदारी आतापर्यंत अवघी 3.29 टक्‍के एवढी आहे. विज्ञानाच्या दुनियेत महिलांना फारसे प्रोत्साहन दिले गेले नाही, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. विज्ञानासारखे विषय महिलांसाठी अत्यंत क्‍लिष्ट आणि त्यांच्या आकलनाबाहेरचे आहेत, असेच पुरुषसत्ताक व्यवस्थेने नेहमी मानले. चार्लस डार्विन यांच्यासारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाचेही तेच मत होते. 1871 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या “डिसेन्ट ऑफ मॅन’ या पुस्तकात डार्विन लिहितात की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला पिछाडीवर आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांकडे जैविक क्षमता कमी असणे हे त्यामागील
कारण आहे.

डार्विन यांचा हा विचार पूर्वग्रहाने युक्‍त असून, स्त्री आणि पुरुष यांच्या जैविक क्षमतेत फरक असल्याचे किंवा पुरुषांचा बौद्धिक स्तर महिलांपेक्षा अधिक असल्याचे कोणत्याही विज्ञानाने आतापर्यंत सिद्ध केलेले नाही, हेच वास्तव आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीने आपल्या एका संशोधनात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहा वर्षांपर्यंत निरंतर अभ्यास केला. संशोधनात असे आढळून आले की, गणिताच्या परीक्षेत मुले आणि मुलींची क्षमता एकसमान असते. असे असूनसुद्धा परीक्षेच्या आधीच मुली स्वतःला मुलांपेक्षा कमी समजू लागतात. हा विचार आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवाकडे लक्ष वेधतो आणि हे वास्तव जगभरात एकसारखेच आहे.

सामान्यतः आपल्या मुलींना विज्ञानासारख्या विषयात अभ्यास करण्याचा उत्साह त्यांचे आईवडीलच देत नाहीत. विज्ञान हा विषय मुलींसाठी योग्य नाही, या एका गैरसमजापलीकडे असा विचार करण्यामागे कोणताही शुद्ध तर्क आढळून येत नाही. विज्ञानाच्या क्षेत्रात मुली दोन स्तरांवर मागे पडत जातात. एक म्हणजे शाळेत दहावीपर्यंत मुले आणि मुली दोघेही विज्ञान शिकतात; परंतु त्यानंतर मुली विज्ञानाचा नाद सोडून देतात. दुसरा स्तर म्हणजे, ज्या मुली दहावीनंतर विज्ञानाचा अभ्यास करतात, त्या संशोधनाच्या स्तरापर्यंत जाऊच शकत नाहीत.

ऑर्गनाइजेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हल्पमेन्ट या संस्थेने केलेल्या अध्ययनाच्या अहवालात असे म्हटले आहे की, आत्मविश्‍वासाचा अभाव आणि रूढीवादी विचारांमुळे मुलींना विज्ञान विषयात आपले भविष्य दिसत नाही. उलटपक्षी विज्ञान असे सांगते की, विज्ञानातील रुचीचा जैविकतेशी काडीमात्र संबंध नाही. हा सांस्कृतिक आणि सामाजिक रूढीवादी मानसिकतेचाच परिणाम आहे.
एका अध्ययनात म्हटले आहे की, लिंगानुसार कसा व्यवहार आपल्याकडून अपेक्षित आहे, ही समजूत पाच वर्षांच्या मुलांमध्येच विकसित होते. एका प्रयोगादरम्यान मुलांच्या एका समूहाला एक चित्र दाखविण्यात आले. त्या चित्रात मुलगी लाकूड तोडत होती. नंतर त्या चित्राविषयी जेव्हा मुलांना प्रश्‍न विचारण्यात आले, तेव्हा अधिकांश मुलांनी सांगितले की, “मुलगा लाकूड तोडत होता.’ पूर्वग्रहाने युक्‍त अशा त्यांच्या मेंदूला मुलगी लाकूड तोडत आहे, हे दृष्यही मानवलेले नव्हते. पूर्वग्रहाचे हेच जाळे विज्ञानाच्या क्षेत्रावरही पसरलेले आहे. म्हणूनच विज्ञानाच्या क्षेत्रात 96.71 टक्‍के नोबेल पारितोषिके पुरुषांनाच मिळाली आहेत.

मार्गारेट डब्ल्यू. रेसिस्टर यांनी “माटिल्डा इफेक्‍ट’चे विवेचन केले होते. हा एक प्रकारचा पूर्वग्रह आहे. याचा परिणाम म्हणून महिलांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना मान्यता देण्याऐवजी त्यांच्या कामाचे श्रेय त्यांच्या पुरुष सहकाऱ्याला दिले जाते. उदाहरणार्थ, 1960 मध्ये जोसलिन बेल बरनॉल नावाच्या संशोधिकेने पहिला रेडिओ पल्सर शोधून काढला होता. परंतु त्यासाठी 1974 मध्ये त्यांचे सुपरवायझर
अँटनी हेक्‍श आणि माटन रेल यांना नोबेल पुरस्कार मिळाला.

महिला शास्त्रज्ञांना परिघाबाहेर ढकलण्याची ही प्रवृत्ती न्यायोचित म्हणता येणार नाही. भविष्यात ज्या क्षेत्रांमध्ये माहिती आणि संचार तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल, त्या क्षेत्रांमध्येच 90 टक्‍के रोजगार निर्माण होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तर हे अगदीच न्यायविसंगत ठरते. अशा वेळी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत विषय आणि करिअरच्या पर्यायांमध्ये महिला आणि मुलींची संख्या वाढविणे आत्यंतिक आवश्‍यक आहे. कारण यामुळेच शाश्‍वत विकासाच्या दिशेने आपण मार्गक्रमण करू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.