ता. 12, माहे सप्टेंबर, सन 1976
नवी दिल्ली – हवाई चाच्यांनी काल पळवून नेलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानातील सर्वच्या सर्व प्रवासी आज दिल्लीच्या पालम विमानतळावर सुखरूप परतले. हवाई चाच्यांनी काल दिल्ली-मुंबई मार्गावरील बोईंग 737 हे विमान उड्डाणानंतर पळवून नेऊन पाकिस्तानात लाहोर येथे उतरविले होते.
रेडिओ पाकिस्तानवरून बातम्यांमध्ये सांगण्यात आले की, बोईंग 737 वरील 6 सशस्त्र चाच्यांवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे व सर्व प्रवासी आणि विमानातील 7 कर्मचारी यांना मुक्त करण्यात आले आहे.
चिन्यांची श्रद्धा खरी ठरली
पेकिंग – तांग शान येथील भयानक भूकंपानंतर चिनी अंधश्रद्धेवर आधारलेल्या अफवांशी चिनी अधिकारी झगडत असतानाच अध्यक्ष माओ यांचे निधन झाले आहे. गेल्या शतकात अनेक नैसर्गिक आपत्तीनंतर तत्कालिन सत्तेचा अंतःकाळ जवळ आल्याचे भविष्य वर्तविण्यात आले होते ते खरे ठरलेही होते.
चालू शतकात किरीन प्रांतात उल्कांचा वर्षाव झाला. त्यानंतर युनान प्रांतात भूकंपाचा धक्का बसला आणि नंतर महाभयानक भूकंपात तर तांग शान हे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले. नंतर झेचवान प्रांताच्या उत्तर भागातही भूकंपाचा तडाखा बसला. त्यामुळे माओचे निधन होणार अशा अफवांना चीनमध्ये चोर आला होता आणि खरेच माओ यांचे निधन झाले.