अमेरिकेत महिला अध्यक्ष होऊ शकेल
नवी दिल्ली, दि. 2 – अमेरिकेचे अध्यक्षपद महिलेलाही मिळू शकेल; प्रश्न फक्त काळाचा आहे, असे उद्गार अध्यक्ष कार्टर यांच्या पत्नी रोझालिन यांनी आज वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतीत काढले. रोझालिन कार्टर म्हणाल्या, ‘अमेरिकन काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग कमी आहे, याबद्दल आम्हाला चिंता आहे.
प्रतिनिधीगृहात 18 महिला सदस्य आहेत, तर सिनेटमध्ये एकही नाही.’ राष्ट्रपती भवनाच्या ‘नालंदा’गृहात सुमारे तासभर ही मुलाखत चालली. रोझालिन कार्टर यांनी प्रत्येक प्रश्नास उत्साहाने, आत्मविश्वासपूर्वक उत्तरे दिली.
गाडगेबाबांनी सामान्यजनांना अज्ञानाच्या अंधारातून दूर नेले
कोल्हापूर – आज कोणीही अस्पृश्योद्धाराचे व्रत, पाठ गिरवून घेत आहेत. मात्र संत गाडगेबाबांनी हे धडे कोणापासूनही न घेता स्वकर्तृत्वाने अस्पृश्योद्धार केला. त्यांनी प्रथम नाणे स्वतंत्र पाडून ते कर्तृत्वाने खरे केले, असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांनी काढले.
जातीयवाद, पशूहत्या, अज्ञान, रूढी, परंपरा याविरुद्ध गाडगेबाबा होते. त्यांनी सामान्यांना नेहमीच्या जीवनात येणार्या गोष्टींचे दाखले देऊन अज्ञानाच्या अंधकारापासून दूर नेले. संत गाडगेबाबांचे ध्येय, तत्त्व व आदर्श युवकांनी जोपासला पाहिजे.