न्यूट्रॉन बॉम्ब : अमेरिकेचे अनुकरण करू – ब्रेझनेव्ह
मॉस्को, दि. 24 – अमेरिका जर न्यूट्रॉन बॉम्ब बनविणार असेलच तर रशियास इच्छा नसतानाही तसेच करावे लागेल, असे रशियाचे अध्यक्ष लिओनिद ब्रेझनेव्ह म्हणाले. प्रवदाला दिलेल्या मुलाखतीत मि. ब्रेझनेव्ह म्हणतात, न्यूट्रॉन बॉम्ब हे अमानुष हत्यार आहे. निरपराध्यांना त्यामुळे शिक्षा होईल.
नॅशनल हेराल्ड चालू राहावा
नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र बंद पडू नये, ते चालू राहावे, असे सरकारला वाटत असल्याचे माहिती व नभोवाणीमंत्री लालकृष्ण अडवानी यांनी राज्यसभेत सांगितले.
न्यायव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान – न्या. बेग
कोझिकोड – देशातील न्यायव्यवस्थेपुढे गंभीर आव्हान उभे असल्याचे सरन्यायाधीश एम. एच. बेग येथे म्हणाले. न्यायव्यवस्थेला भेडसावणार्या प्रश्नांना ठामपणे तोंड दिले नाही, तर त्यातून प्रचंड अनर्थ ओढवेल, असेही बेग म्हणाले. न्याय मिळण्यास होणार्या दिरंगाईचा प्रश्न न सोडविल्यास संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल, असा इशाराही बेग यांनी दिला.
पासपोर्ट जप्त करताना कारणे दिली पाहिजे
नवी दिल्ली – कोणत्याही व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करताना कारणे दिली पाहिजेत, असा आदेश दिल्ली हायकोर्टाने दिला आहे.