आपला समाज कीर्तनाने कधी सुधारला नाही आणि तमाशाने कधी बिघडला नाही, असं म्हणतात. खरं तर असं म्हटल्यामुळे तमाशासारख्या अस्सल कष्टसाध्य कलेची अप्रतिष्ठा होते; पण तरीही एखाद्या व्यक्तीनं त्याच्या प्रतिष्ठेला न शोभणारं वर्तन केलं तर त्याला “तमाशा केला’ किंवा “गोंधळ घातला’ असं म्हणून आपणच आपल्या अस्सल कलांचा अवमान करतो.
असो, आपला समाज कीर्तनाने सुधारला नाही, हे मात्र खरं. शिवाय, कलांची प्रतिष्ठा हा इथला विषय नसून, विषय आहे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बीएची परीक्षा देत आहेत आणि त्यांना विद्यापीठाने परीक्षेसाठी हॉलतिकीटही पाठवलंय, असं जर कुणी सांगितलं तर..? निश्चितपणे हा प्रकार बिहारमध्ये घडलेला असणार, असंच कुणीही म्हणेल.
आपणही इथेच काही वर्षांपूर्वी अशा प्रकारांवर चर्चा केली होती. त्यावेळी सनी लिओनी “परीक्षार्थी’ असल्याचं दिसून आलं होतं. आता ती “पालक’ झालीये, कारण एका विद्यार्थ्याला मिळालेल्या हॉलतिकिटावर सनीचं नाव “आईचे नाव’ या रकान्यात आहे आणि वडिलांच्या रकान्यात नाव आहे अभिनेता इमरान हाशमीचं. या दोघांना यंदा “प्रमोशन’ मिळालं म्हणायचं! पण यंदा बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांचाही फोटो एका हॉलतिकिटावर दिसून आलाय. याखेरीज कॉंग्रेस नेते राहुल गांधीही “भारत जोडो यात्रे’दरम्यान बिहारमधल्या दरभंगा येथील ललित नारायण मिथिला विद्यापीठाची परीक्षा देणार आहेत म्हणे!
केवळ राजकीय व्यक्तींनाच नव्हे तर क्रिकेटपटूंचेही फोटो हॉलतिकिटावर दिसतायत. उदाहरणार्थ, मनमुराद क्रिकेट खेळून झाल्यावर महेंद्रसिंह धोनी आता डिगरी घेणार, असंच त्याचा फोटो पाहून कुणालाही वाटेल. हे सगळं का घडतं आणि बिहारमध्येच का घडतं, हा खरोखर संशोधनाचा विषय आहे. जर विद्यार्थी विद्यापीठाकडे आणि विद्यापीठ विद्यार्थ्यांकडे बोट दाखवत असेल, तर त्यावर शास्त्रोक्त संशोधन व्हायलाच हवं. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉलतिकीट डाउनलोड केलंय. त्यामुळे चूक विद्यापीठाचीच आहे
.दुसरीकडे, विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, सगळ्यांचे फॉर्म ऑनलाइन भरून घेतलेत आणि कागदपत्रं, फोटो वगैरे विद्यार्थ्यांनीच अपलोड केलेत. त्यातच काही खट्याळ पोरांनी महनीय व्यक्तींचे फोटो आपल्या फोटोऐवजी अपलोड केलेत. असं करणाऱ्यांना शोधून काढून शिक्षा देणार असल्याचंही विद्यापीठानं म्हटलंय. परंतु पंतप्रधानांचा फोटो असलेलं हॉलतिकीट चक्क् गुडिया कुमारी नावाच्या एका मुलीला मिळालंय आणि मुली असं काही करतील का, हाही प्रश्न अनेकांना पडलाय. दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की, की पोरा-पोरींना ऑनलाइन कागदपत्रं डाउनलोड करायला सांगितल्यानंतर विद्यापीठ काय करतं..?अर्जांची पडताळणी वगैरे काही असतं की नाही? असती तर त्याच स्तरावर हे उघड झालं असतं. पुढला अनर्थ टळला असता.
सगळाच अंधाधुंद कारभार आहे. आता आलेली हॉलतिकिटं पोरापोरींनी सोशल मीडियावरून एकमेकांना पाठवायला सुरुवात केली, तेव्हा विद्यापीठाला जाग आली. अधिकाऱ्यांनी फतवा काढला… अशा हॉलतिकिटांचे फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करणार! मुद्दा असा की, हे जर वारंवार घडत असेल, तर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबद्दल विद्यापीठ का बोलत नाही? ऑनलाइन अर्ज भरण्यापासून हॉलतिकिटं वितरित होईपर्यंत सगळंच काम “सिस्टिम’कडे सोपवलं असेल, पडताळणी होतच नसेल, तर परीक्षा विद्यापीठाचीच आहे..!
हिमांशू