प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 – राज्यात एक वर्षात जेमतेम 67 गावांतील गावठाणाची मोजणी पूर्ण होऊन रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळत होते. मात्र राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केल्याने एका दिवसाला चौदा, तर वर्षभरात पाच हजार गावांतील जमिनींची मोजणी पूर्ण करून रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम पूर्ण होत आहे.
पारंपारिक पद्धतीने गावठाणाची मोजणी करण्यास किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. 1960 पासून 2020 पर्यंत राज्यातील केवळ चार हजार गावांतील नागरिकांना आतापर्यंत प्रॉपर्टी कार्ड मिळाले होते. भूमी अभिलेख विभागाने ड्रोनच्या सहाय्याने गावठाणांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाची दोन वर्षे सोडल्यानंतर गेल्या वर्षभरात या विभागाकडून 5,118 गावांच्या गावठाणाच्या मोजणीचा विक्रम केला. तर पाच लाख 88 हजार 551 नागरिकांना मालकी हक्काचा पुरावा असलेल्या प्रॉपर्टी कार्डचे वाटप करण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत जवळपास दहा लाख रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड वाटप करण्याचे नियोजन असल्याचे भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदत घेण्यात आली. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारण पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र ड्रोनच्या सहाय्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते. गेल्या वर्षात या तंत्रज्ञानाचा वापर करून पाच हजार 118 गावांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे गेल्या साठ वर्षांत चार हजार गावे आणि एक वर्षात पाच हजारांहून अधिक गावांच्या मोजणीचे काम पूर्ण झाले.