मंचर -करोना व्हायरसमुळे चिकन खाणे आरोग्याला अपायकारक असल्याचा सोशल मीडियावरील अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. सद्यस्थितीत ब्रॉयलर कोंबड्यांची उपलब्धता आणि मागणी याचा ताळमेळ बसत नसल्याने ब्रॉयलर कोंबडीचे बाजारभाव कडाडले आहे. किरकोळ विक्रेते ब्रॉयलर कोंबडीचे चिकन 180 ते 200 रुपये किलो दरम्यान विकत आहे.
आंबेगाव तालुक्यात सहाशे पोल्टी फार्म आहेत; परंतु ब्रॉयलर कोंबड्यांमुळे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतो. या अफवेमुळे कोंबडीला मागणी नसल्यामुळे काही पोल्टी फार्म बंद आहेत. सुमारे पन्नास टक्के पोल्टीफार्म बंद झाल्यामुळे मालाचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ब्रॉयलर कोंबडीचे चिकन आणि करोना विषाणूचा कसलाही संबंध नसल्याचे परिपत्रक जारी केले.
यानंतर नागरिकांचा मांसाहार करण्याकडे कल वाढू लागला. आता लॉकडाऊनमुळे बहुतांशी गावांमध्ये चिकन, मटणाची दुकाने ठराविक वेळेत सुरू आहेत. चिकन व्यवसायिक फोनद्वारे ऑर्डर घेऊन सोशल डिस्टींगचे पालन करुन व्यवसाय करत आहेत. काही ठिकाणी घरपोच डिलिव्हरी सेवा उपलब्ध आहेत.
दर 250 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
ब्रॉयलर कोंबडीची मागणी वाढल्याने बाजारात तुटवडा जाणवत असल्याने बाजारभाव वाढत आहे. 3 मे रोजी लॉकडाऊन संपण्याची शक्यता आहे. ग्राहकांची मागणी आणि ब्रॉयलर चिकनचा तुटवडा यामुळे ब्रॉयलर कोंबडीचे चिकन किरकोळ विक्रेते 250 रुपये किलोने विकण्याची शक्यता चिकन व्यवसायिक इसाक शेख, जावेद मिस्त्री, इम्रान मोमीन यांनी वर्तवली. मटणाचे दर सध्याच्या परिस्थितीत 650 ते 700 रुपये किलो दरम्यान आहेत.
लॉकडाऊन होण्याच्या काळापूर्वी ग्राहकांकडून ब्रॉयलर कोंबडीला मागणी नसल्याने शेतकरी आणि कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आता कोंबडीचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांचे व कंपन्यांचे आर्थिक नुकसान थोड्याफार प्रमाणात भरुन निघण्यास मदत होणार आहे.
– प्रकाश वळसे पाटील, पोल्ट्रीधारक
– शफीभाई मोमीन, आंबेगाव अँग्रो