मुंबई: भारतीय रुपयाचे आज अधिक अवमूल्यन होऊन रुपयाची किंमत आजवरच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. रुपयाच्या तुलनेत आज डॉलर्सचा भाव आज 76 रुपये 87 पैसे इतका झाला आहे. डॉलर अधिक मजबूत झाल्यानेच रुपयाचे अवमूल्यन झाल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गुंतवणूकदारांनी सध्याच्या अस्थिर वातावरणात डॉलर मध्येच गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने डॉलर अधिक मजबूत होताना दिसत आहे. भारतीय रुपयाच नव्हे तर अशियातील अन्यही चलन डॉलरच्या तुलनेत घसरलेले दिसून आले. करोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेतील दोलायमान स्थितीचा अजून नेमका अंदाज लागत नसल्याने चलन बाजार अजून अस्थिरच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. जगभरात करोना बाधितांची संख्या आता 25 लाखांच्यावर गेली आहे.