न्यूयॉर्क – अमेरिकेतील प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी फायझर आणि जर्मनीमधील औषध निर्मिती कंपनी बायोटेक एसई या दोन्ही कंपन्यांनी बनवलेल्या कोविड-19 विरोधातील औषधाची मानवी चाचणी एका उमेदवारावर घेतली जात असून आतापर्यंतच्या परिणामानुसार या औषधांचा सकारात्मक प्रतिसाद संबंधित उमेदवारावर बघायला मिळाला आहे. हा उमेदवार आता पूर्णपणे सुरक्षित, संसर्गाला प्रतिकार करण्यास सक्षम असून त्याच्यात ऍन्टीबॉडीजही निर्माण होत अहेत, असे अभ्यासानंतर निष्पन्न होते आहे. या उमेदवारावरील औषधाच्या चाचणीबाबतचा अभ्यास “मेडआरएक्सिव्ह’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होण्यास सिद्ध झाला आहे. या उमेदवाराबाबतचा प्राथमिक वैद्यकीय अभ्यास त्यात लिहीला गेला आहे. “न्यूक्लिओसाईड मोडिफाईड मेसेंजर “आरएनए’, बीएनटी162बी1′ या औषधाबाबत त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोविड-19 मधून बरा झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा देण्यात आलेल्या रुग्णापेक्षा या औषधाचे दोन डोस घेतलेल्या उमेदवाराची स्थिती अधिक चांगली असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे अमेरिकेच्या बेलोर कॉलेज ऑफ मेडिसिनमधील लस वैज्ञानिक पीटर होटेझ यांनी ट्विट केले आहे. तर हे औषध मानवी पेशींना विषाणूशी लढा देण्यास सक्षम बनवते, असे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांसह या संशोधनात सहभागी असलेल्यांनी सांगितले.