न्यूयॉर्क: जगाला भेडसावणाऱ्या करोनाच्या नव्या व्हेरियंटने जगात जवळपास सर्वच देशात पसरला आहे. यातच आता जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस करोनाच्या ओमायक्रॉन या व्हेरियंटवर 90 टक्के प्रभावी असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. यामुळे मृत्यूदर 90 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार असल्याचे इस्त्रायलमध्ये केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.
संशोधनात सहभागी 8,43,208 लोकांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. या गटांपैकी एकामध्ये बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता, तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या निष्कर्षांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.
क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की, फायझरच्या कोविड लसीचा बूस्टर (तिसरा) डोस करोना विषाणूच्या डेल्टा प्रकारातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.
जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरु आहे. त्याच वेळी, कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या देखील सतत वाढत आहे. आतापर्यंत जगभरातील करोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 26 कोटी 93 लाख 21 हजार 866 च्या पुढे गेली आहे. तर, करोनामुळे आतापर्यंत 53 लाख 10 हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत.