न्यूयॉर्क : जगभराची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी लस शोधण्याचे काम बायोएनटेक कंपनीने सुरु केले आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढल्यास पुढील 100 दिवसांत लस बाजारात आणण्याची तयारी बायोएनटेकने दर्शवली आहे. बायोएनटेक ही अमेरिकेत फायझरसोबत मिळून कोविड लस विकसित करणारी कंपनी आहे.
ओमिक्रॉनचा संसर्ग पसरत असल्याने कंपनीने त्यावर काम सुरु केले असल्याचे बायोएनटेककडून सांगण्यात आले आहे. ओमिक्रॉन (B.1.1.529) जगभरात पसरण्याची शक्यता गृहीत धरुन लसीमध्ये आवश्यक ते बदल करत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. बायोएनटेकची सध्याची लस ओमिक्रॉनवर किती प्रभावी ठरते हे निरीक्षणानंतर येत्या दोन आठवड्यात कळेल आणि त्या निष्कर्षावर आधारीत आवश्यक बदल लसीमध्ये केले जातील.
फायझर आणि बायोएनटेक कंपनीने, ”आम्हांला आशा आहे की, आम्ही ओमिक्रॉन व्हेरिएंटवर 100 दिवसांत प्रभावी लस संशोधन आणि उत्पादन करण्यात सक्षम आहोत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटपासून खूप वेगळा आहे.” असे म्हटले आहे. कंपनीने महिनाभर आधीच ओमिक्रॉन व्हेरिएंटवर लस बनवण्याची तयारी सुरु केल्याचे सांगण्यात येत आहे.