कंपनी ओळख
गेली दोन दशके रुग्ण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणारी पॉली मेडिक्युअर कंपनी आता भारतात वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करण्यावर भर देणारी कंपनी म्हणून पुढे येत आहे. केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजना आणली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन वैद्यकीय उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनवाढीला चालना देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने कंपनीच्या संचालक मंडळाने क्वॉलिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट (क्यूआयपी) द्वारे 400 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिलेली आहे.
पॉली मेडिक्युअर कंपनीची सुरुवात प्रवर्तक म्हणून जे. के बैद, हिमांशू बैद, बी. आर. मेहता आणि ऋषी बैद यांनी केली. कंपनीची स्थापना 30 मार्च 1995 रोजी झाली. सुरुवातीला रक्तासाठी लागणाऱ्या पिशव्यांचे उत्पादन करणारा प्रकल्प कंपनीने उभारला. त्याचबरोबर रुग्णाला रक्त, द्रव, औषधे, पोषक घटक देण्यासाठी एकाचवेळी रुग्णाच्या हातावर टोचून ठेवण्यात येणारे इन्ट्राव्हेनस (आयव्ही) कॅन्युला, श्वासोच्छ्वासासाठी रुग्णाच्या तोंडावाटे घालण्यात येणारी एन्डोट्राशील ट्यूब्ज, कोल्ड थेरपी पॅडस् आणि रुग्णांना लागणाऱ्या अन्य दैनंदिन वैद्यकीय गोष्टींचे उत्पादन कंपनीने सुरू केले.
तांत्रिक बाबी आणि संयुक्त मार्केटिंग व्यवस्थेसाठी कंपनीने अमेरिकेतील कोल्ड आईस कॉर्पोरेशन आणि मार्केट मेडिकल प्रॉडक्टस् यांच्याशी 1996 मध्ये सहकार्य करार केला. एप्रिल 97 पासून मेडिकल डिस्पोजेबल्स, कोल्ड/हॉट थेरपी पॅक्स यांचे उत्पादन सुरू करण्यात आले. 97-98 मध्ये एकूण उत्पादन क्षमतेच्या सुमारे 43 टक्के वापर करत कंपनीने 51 लाख मेडिकल डिस्पोजेबल्सचे उत्पादन केले. आजच्या घडीला कंपनीच्या प्रकल्पांमध्ये उत्पादित केलेल्या उत्पादनांचा रोज जगभरातील लाखो रुग्णांशी संबंध येतो.
आजाराच्या निदानासाठी लागणाऱ्या साधने/उपकरणांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याचा कंपनीचा विचार आहे. डायलिसिसशी संबंधित व्यवसायात वेगाने विस्तार करण्याची कंपनीला मोठी संधी आहे, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू बैद यांनी नुकतेच एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. सध्याच्या 30 ते 40 कोटींच्या उलाढालीवरून येत्या पाच वर्षात 300 ते 400 कोटीपर्यंत मजल मारण्याची कंपनीची क्षमता आहे.
त्यासाठी कंपनी वेगाने गुंतवणूक करत असून व्यवसायाच्या नव्या संधी शोधत आहे. त्यामध्ये वेगाने वाढणाऱ्या निदानासाठीच्या साधनांचा समावेश आहे. त्याखेरीज कंपनी दोन नवे प्रकल्प उभारत आहे. 2023 पर्यंत या प्रकल्पांमधून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.
मूत्रपिंडांशी संबंधित व्यवसायाशी निगडीत हे उत्पादन असेल आणि त्यासाठी 200 ते 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. उरलेली गुंतवणूक आजाराचे निदान करण्याच्या क्षेत्रात आणि हृदय आणि त्याच्याशी संबंधित रक्तवाहिन्यांशी निगडीत लागणाऱ्या साधनांच्या उत्पादनात केली जाणार आहे. विस्तारासंदर्भातील कंपनीचे लक्ष असणारे आणखी एक क्षेत्र म्हणजे ऑन्कॉलॉजी.
भारतातील तसेच युरोपातील काही कंपन्या ताब्यात घेण्यासंदर्भातही कंपनी काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रासाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन आणि निर्यात करणारी आघाडीची कंपनी म्हणून पॉली मेडिक्युअर ओळखली जाऊ लागली. केंद्र सरकारच्या रसायन व खते मंत्रालयातील औषध विभागातर्फे कंपनीला 2018 मध्ये वैद्यकीय उपकरणे उत्पादित करणारी कंपनी म्हणून मान्यता मिळालेली आहे.
मागील सलग सहा वर्षे सर्वाधिक वैद्यकीय उपकरणे करणारी कंपनी म्हणून कंपनीने ओळख प्राप्त केलेली आहे. कंपनीच्या आठ प्रकल्पांमधून उच्च गुणवत्तेची वैद्यकीय उपकरणे उत्पादित करण्याचा मोठा अनुभव कंपनीकडे आहे. कंपनीचे भारतात फरिदाबादमध्ये तीन आणि जयपूर व हरिद्वार येथे प्रत्येकी एक प्रकल्प आहे. त्याखेरीज इटली आणि चीनमध्ये पूर्ण मालकीच्या उपकंपन्यांचे प्रत्येकी एक प्रकल्प आणि इजिप्तमध्ये एक जॉईंट व्हेंचर असा कंपनीचा विस्तार आहे. या सर्व प्रकल्पांमधून विविध 125 उत्पादनांची निर्मिती केली जाते. उच्च प्रतीची स्वयंचलित यंत्रणा आणि एकूण उत्पादन प्रक्रियेवरील उच्च नियंत्रण यामुळे सातत्याने गुणवत्तापूर्ण उत्पादने तयार होत राहतात.
(शुक्रवारचा बंद भाव – रु. 532.60)
कंपनीच्या वाटचालीतील प्रमुख टप्पे
1997 – उत्पादन सुरू झाले.
2001 -फरिदाबाद येथील प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला.
2002 -इजिप्तमध्ये जॉईंटव्हेचरद्वारे पदार्पण
2004 -फरिदाबादमधील दुसऱ्या प्रकल्पाचे विस्तारीकरण
2006 -यूएस सेफ्टी सिरिंजेस या कंपनीचे 75 टक्के शेअर घेतले.
2007 – हरिद्वार प्रकल्पात संशोधन व विकास केंद्र सुरू झाले.
2009 -चीनमधील प्रकल्पाची सुरुवात
2011 – कंपनीचे शेअरबाजारात पदार्पण
2014 – जयपूरमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोन
2016 – नवे संशोधन व विकास केंद्र सुरू
2018 – इटलीतील प्लॅन1हेल्थ ताब्यात घेतली.
– सुहास यादव (suhaspyadav@gmail.com)