जुन्नर-छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नरमध्ये भव्य शिवसंस्कार सृष्टीची संकल्पना खासदार अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी मांडली होती.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याच संदर्भात आमदार बेनके यांना विचारणा केली असता, ते म्हणाले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसंस्कार सृष्टीचे सादरीकरण पालकमंत्री अजित पवार यांचेसमोर केले आहे. त्यापुढे कसे पाऊल टाकायचे, याबाबतचा आमचा रोडमॅप ठरला आहे. या प्रकल्पास 125 ते 150 रुपये खर्च अपेक्षित आहे.
अधिवेशनादरम्यान शिवसंस्कार सृष्टी नेमकी कुठे करायची, जागा कुठे उपलब्ध आहे आणि फंड कसा उभा करायचा यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी खासदार डॉ. कोल्हे व मी स्वतः चर्चा करणार आहोत. येणाऱ्या शिवजयंतीपूर्वी शिवसंस्कार सृष्टी प्रकल्पासाठी जागा व आराखडा निश्चित झाल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार या शिवजयंतीला शिवसंस्कार सृष्टीची घोषणा करतील अशी अपेक्षा बाळगूया असे बेनके म्हणाले.
19 फेब्रुवारी 2020 शिवजयंतीला 23 कोटी रुपये अजितदादांनी जाहीर केले होते; परंतु करोना कालावधीमुळे टेंडर प्रक्रिया होऊ शकली नव्हती; आता टेंडर प्रक्रिया पुढील महिन्यात होऊन कामेही लवकर निश्चितपणे सुरू होतील. ज्याप्रमाणे माजी आमदार वल्लभ बेनके यांनी आजपर्यंत विकासाची घोडदौड सुरू ठेवली.
त्याचप्रमाणे शिवजन्मभूमीला काहीही कमी पडू देणार नाही. महाविकास आघाडी सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे व मी स्वतः किल्ले शिवनेरी व जुन्नर तालुक्याच्या विकासाठी कार्य करत राहू, असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.