नवी दिल्ली – आप विरुद्ध भाजप अशा संघर्षामुळे दिल्लीतील राजकारण तापले आहे. आता तो संघर्ष थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दारात पोहोचणार आहे. दिल्लीतील भाजपचे आमदार 6 सप्टेंबरला राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. ते भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवरून दिल्लीतील आप सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार आहेत.
दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन सध्या तुरुंगात आहेत. तर, सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर विविध आरोप करून आप त्यांचा अवमान करत आहे, याबाबी भाजप राष्ट्रपतींपुढे मांडणार आहे.
भाजपपाठोपाठ आपचे शिष्टमंडळ 7 सप्टेंबरला राष्ट्रपतींची भेट घेणार आहे. इतर पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस हाती घेतले जाते. त्यामुळे देशाच्या लोकशाहीला गंभीर धोका असल्याची भूमिका आप राष्ट्रपतींसमोर मांडणार आहे.
मागील काही दिवसांपासून आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यातून त्यांच्यात शह-काटशहाचे राजकारण रंगले आहे.