मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा (Shiv Sena Dasara Melava 2022) होणार की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेतली आहे. पवार यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पवारांच्या या सल्ल्यामुळे ते शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मैदानात उतरले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गट आणि शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावरून वाद न घालण्याचे आवाहन केले आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून मेळावे घेत आले आहेत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर मेळावे घेत आहेत.
उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे नेतृत्व करतील असे बाळासाहेबांनी सांगितले होते. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये, असे अजित पवार म्हणाले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका. शिवाजी पार्क मैदानावरील सभा झाल्यानंतरच जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.