Pm Narendra Modi Caste – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेसच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात विकास मंदावला होता, पण आम्ही गती वाढवली आहे. काँग्रेसला मागासवर्गीय लोकांची प्रगती करायची नाही. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार प्रहार करत गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वत:च्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश केल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदी जन्माने मागास जातीतील नाहीत – राहुल गांधी
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आरोप केला की, ‘पीएम मोदी जन्माने मागासलेल्या जातीतील नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील ‘तेली’ जातीत झाला. भाजपने 2000 साली त्या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला. त्यांचा (पीएम मोदी) जन्म सामान्य वर्गात झाला आहे. ते कधीच जात जनगणना करणार नाहीत कारण त्यांचा जन्म ओबीसीमध्ये झाला नाही. पंतप्रधान मोदी स्वतःला ओबीसी म्हणवून लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
मुख्यमंत्री होण्यापूर्वीच ओबीसी जातीचा समावेश होता – भाजप
पीएम मोदींच्या जातीबाबत राहुल गांधींचे वक्तव्य भाजपने फेटाळून लावले आहे. भाजपने म्हटले की, राहुल गांधी लोकांमध्ये संभ्रम पसरवत आहेत आणि खोटे बोलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना गुजरातमधील इतर मागासवर्गीयांच्या यादीत त्यांच्या जातीचा समावेश केला नाही. भाजपचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदींची जात गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याच्या दोन वर्ष आधी 27 ऑक्टोबर 1999 रोजी ओबीसी म्हणून अधिसूचित करण्यात आली होती. भाजपने तीव्र प्रतिक्रिया देत नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत संपूर्ण नेहरू-गांधी परिवार ओबीसींच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.