IND Vs ENG Virat Kohli Test Seires :- टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एकही सामना खेळणार नसल्याची शक्यता बळावली आहे. याआधी अशा बातम्या समोर आल्या होत्या की, विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीचा भाग असू शकतो. पण इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर राहू शकतो.
शेवटच्या तीन कसोटींसाठी 9 फेब्रुवारीला टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, विराट कोहलीने अद्यापही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला या मालिकेतील उर्वरित किती सामने खेळण्यासाठी उपलब्ध असणार याची माहिती दिलेली नाही.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहलीला टीम इंडियात स्थान मिळाले होते. मात्र वैयक्तिक कारण सांगून विराट कोहलीने मालिका सुरू होण्यापूर्वीच आपले नाव मागे घेतले आणि विराट कोहलीने याआधी स्वतःला पहिल्या दोन सामन्यांसाठी अनुपलब्ध घोषित केले होते. यानंतर, ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीतूनही बाहेर असेल. आता समोर आलेल्या माहितीनुसार, विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीतही पुनरागमन करणार नाही.
विराट स्वतः घेईल परतण्याचा निर्णय
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, टीम इंडियात पुनरागमन करण्याचा निर्णय विराट कोहली स्वतः घेणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “संघात कधी परतायचे हे विराट कोहली स्वत:च ठरवेल. विराट कोहलीने अद्याप बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेबाबत माहिती दिलेली नाही. जेव्हा विराट कोहली उपलब्ध असेल तेव्हा त्याचा टीम इंडियामध्ये समावेश केला जाईल.”
विराट कोहली न खेळणे हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे. विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. विराट कोहलीने गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही विराट कोहलीने चांगली कामगिरी केली होती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियामध्ये सध्या 100 कसोटी खेळण्याचा अनुभव असलेला एकही खेळाडू नाही.