पुणे – पोटासाठी चालत जाणारे कुटुंब… चार, पाच तासांची दरमजल… बालेवाडीची दिशा… लेकरं थकलेली… माऊली दमलेली अन् तेवढ्यात पोलिसांची गाडी… उतरलेला अधिकारी आणि या स्थलांतरीत कुटुंबाच्या खाण्या पिण्याची सोय… हे आणि असं “100 नंबरी’ मदत कार्य तब्बल 405 कुटूंबांना केलंय ते पुणे पोलिसांतील अधिकाऱ्यांनी.
पोटासाठी महाराष्ट्रात आलेली माणसं आपल्या गावी जमेल तसे पोहोचण्याचे प्रयत्न करत आहेत, अशा काळात पोलिसांकडून माणुसकी आणि संवेदनशीलता दाखवली जात आहे. पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनीही अशाच एका कुटुंबाला आधार दिला. मजुरांच्या बसगाड्यांची व्यवस्था पाहून शिसवे हे वाघोली येथून संध्याकाळी सातच्या सुमारास शिवाजीनगर येथील कार्यालयात परतत होते.
येरवड्याच्या शाहादावल बाबा दर्ग्यापाशी त्यांना एक कुटुंब पाच मुलांसह पायी जाताना दिसलं. त्यांना पाहून शिसवे यांनी गाडी थांबवली त्यांची चौकशी केली. हे लोकमूळचे झारखंडचे असून ते खराडीहून बालेवाडीला निघाल्याचे आणि तेथून काही लोकांसोबत झारखंडला जाणार असल्याची माहिती मिळाली. कसे जाणार, मेडिकल रिपोर्ट आदींची चौकशी शिसवे यांनी करीत त्यांच्याकडील बिस्किटांचे पुडे, पाणी आणि मास्क दिले.
शासनाच्या कॅम्पमध्ये जावे आणि तेथून त्यांना ट्रेनने किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने तुम्हाला गावी पोहोचविण्यात येईल, याची खात्री पटवून दिली. त्याच वेळी पोलिसांची एक जीप जात होती. ती थांबवून या कुटूंबाला कॅम्पमध्ये सोडण्याची व्यवस्था केली. अन्य कुटुंबांतील एकाशी संपर्क साधून त्यांनाही कॅम्पमध्ये आणण्याची सोय केली. या पद्धतीने गावाकडे पायी निघालेल्या तब्बल 405 कामगार कुटुंबांना पोलीस आयुक्तांपासून ते उपायुक्तांपर्यंतच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आधार दिला.