पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयातून तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या “स्वॅब’ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकूण दहा जणांना “करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी एक रुग्ण शहराबाहेरील असून नऊ रुग्ण शहरातील रहिवासी आहेत. यामुळे करोना बाधितांचा आकडा 195 पर्यंत जाऊन पोहचला आहे.
महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने शुक्रवारी संशयित रुग्णांचे “स्वॅब’ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये शहरातील फुगेवाडी आणि पिंपळे सौदागर येथील प्रत्येकी एक असे दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांमध्ये 35 वर्षीय पुरुष आणि 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा समावेश आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी आठ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये पुणे येथील ताडीवाला रोड येथील एका 47 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, अन्य रुग्ण हे चिंचवडस्टेशन, रुपीनगर परिसरातील रहिवाशी आहेत. सायंकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या सात रुग्णांमध्ये तीन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. 18 वर्षीय तरुणासह 32 आणि 34 वर्षीय पुरुषांना करोनाची लागण झाली आहे.
14 वर्षाची मुलगी, 17 वर्षांच्या मुलीसह अन्य दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पिंपळे सौदागर आणि गंजपेठ (पुणे) येथील दोन रुग्णांना काल वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तर, आज सांगवी व पुणे येथील रहिवाशी असलेल्या तिघांना घरी सोडले. आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवड शहरातील 119 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
पिंपळे सौदागर, रुपीनगरचा काही भाग सील
पिंपळे सौदागर- साई पॅराडाईज परिसरातील साई साहेब सोसायटी शेजारील अंतर्गत रस्ता, न्यू पूना बेकरी, शिव साई लेन रोड हा परिसर सील करण्यात आला आहे. रुपीनगर येथील पंचदुर्गा सहकारी गृहनिर्माण संस्था, सिध्दीविनायक गणपती मंदिर, मिनारा मस्जिद, माऊली मेडिकल, हमराज टेलर्स, रुपीनगर पोस्ट ऑफिस, रुपीनगर रोड आदी परिसर शनिवारी रात्री अकरा वाजल्यापासून सील करण्यात आला आहे. या परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे.