शिराळा -सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी या दोन तालुक्यांमधील हद्द पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हाबंदी आदेशाचे पालन होऊन दोन्ही तालुक्यातील लोकांना दुसऱ्या तालुक्यात जाता येणार नाही. आरळा- शित्तुर पुलावर पत्रे मारून शिराळा तालुक्याची हद्द पूर्ण बंद केली आहे. शिराळा व शाहूवाडी या तालुक्याची हद्द वारणा नदी आहे. नदीच्या एका काठावर सांगली जिल्ह्यातील शिराळा तर दुसऱ्या काठावर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील गावे आहेत. दोन्ही तालुक्याच्या मधले अंतर एक ते दोन किलोमीटर आहे.
त्यामुळे शाहूवाडी तालुक्यातील लोकांना शिराळा तालुक्यातील आरळा, चरण, शेडगेवाडी, कोकरूड, सागाव येथील बाजारपेठेवर अवलंबून राहवे लागत आहे. शित्तुर- आरळा, उखळू- चांदोली, चरण- सोंडोली, कोकरूड- नेर्ले, बिळाशी- भेडसगाव, सागाव- सरूड या पुलावरून शिराळा तालुक्यात येता येते. करोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड महिना या पुलावरील वाहने व वाहतूक बंद केली असली तरी लोकांची ये- जा सुरू आहे.
मात्र, सध्या मुंबईहून येणारे लोक शिराळा तालुका हद्दीत उतरून शाहूवाडी तालुक्यात जात आहेत. बाजार व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी शिराळा तालुक्यातील बाजारपेठेत या तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे जिल्हाबंदी आदेशाची पायमल्ली होत आहे. शाहूवाडी तालुक्यात करोनाचे रुग्ण असल्याने खबरदारी म्हणून शिराळा तालुक्याच्या बाजूने शाहूवाडी तालुक्याकडे जाणाऱ्या सर्व हद्दी पूर्णतः लॉक करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांना आता शिराळा तालुक्यात येता येणार नाही.