पिंपरी – अंधारात चोरटे लपून बसल्याचा संशय आल्याने रात्रगस्तीवरील पोलिसाने हटकल्याने चोरट्यांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना (शुक्रवारी, दि. 4) पहाटे तीनच्या सुमारास सांगवी येथे घडली. पोलीस नाईक अमोल लावंड असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी अमोल लावंड आणि कल्याण भोसले सांगवी परिसरात रात्रगस्त घालत होते. दरम्यान, सांगवीतील मधुबन सोसायटीमध्ये चोरटे घुसल्याची माहिती समजली. दरम्यान, ते घोलप महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावर येताच दोन जण अंधारता लपून बसल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी वाहन थांबवून मोठ्याने आवाज दिला. पोलिसांचा आवाज ऐकताच चोरट्यांनी त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलीस नाईक लावंड जखमी झाले. तसेच, पोलिसांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. लावंड यांच्या डोळ्याजवळ जखम झाली आहे.