नवी दिल्ली – उत्तरप्रदेश विधानसभेची आगामी निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच नेतृत्वात लढविण्याचा निश्चय भाजपने घेतला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास व्यक्तीला स्थान दिले जाणार असल्याचीही चर्चा आहे.
भाजपातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि संघटनेचे नेतृत्व कायम राहणार आहे. अर्थात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि प्रदेशाध्यक्ष स्वतंत्रदेव सिंग यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढविली जाईल.
मात्र, यूपी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होवू शकतो. यात धार्मिक आणि जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास अरविंदकुमार शर्मा यांना मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार आहे. ते गुजरात कॅडरचे प्रशासकीय अधिकारी होते. राजीनामा दिल्यानंतर ते अलिकडेच विधान परिषदेत निवडून आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबोळे यांनी अलिकडेच लखनौचा दौरा करून राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर भाजपचे संघटन महासचिव बी. एल. संतोष आणि प्रदेश प्रभारी राधामोहन सिग यांनीही यूपीचा दौरा केला होता. मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून फीडबॅक घेण्यात आला होता.