मुंबई – पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंक म्हणजे पीएमसी बॅंकेचा पेच संपुष्टात येण्याची चिन्हे दृष्टीपथात आहेत. रिझर्व बॅंकेने सेंट्रम फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीला स्मॉल फायनान्स बॅंक सुरू करण्याची तत्वतः परवानगी दिली आहे.
सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसची स्मॉल फायनान्स बॅंक नंतर पीएमसी बॅंकेचे अधिग्रहण करणे अपेक्षित आहे.
या कंपनीने पीएमसी बॅंक ताब्यात घेण्याबाबत अर्ज केलेला आहे. अडचणीत असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेने हा प्रश्न सोडविण्यासाठी गुंतवणूकदारांची अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला सेंट्रल फायनान्शिअल सर्व्हिसेसने पुढाकार प्रतिसाद दिला होता. अनुपादक मालमत्ता मोठ्या प्रमाणात वाढल्या नंतर रिझर्व बॅंकेने सप्टेंबर 2019 मध्ये पीएमसी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते.
त्यानंतर ही बॅंक प्रशासक मंडळाच्या नियंत्रणाखाली होती. आतापर्यंत त्याच पद्धतीने काम काम चालू आहे. पीएमसी बॅंकेने आवश्यकतेपेक्षा जास्त कर्ज एचडीआयएल या कंपनीला दिले होते.
त्यामुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. पीएमसी बॅंकेतील गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर रिझर्व बॅंकेने या बॅंकेवर निर्बंध लावले होते. त्याचबरोबर सुरुवातीला फक्त एक हजार रुपये काढण्याची परवानगी ठेवीदारांना देण्यात आली होती.
नंतर परिस्थिती सुधारल्यामुळे ठेवीदारांना एक लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आता सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी पीएमसी बॅंक ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील असून रिझर्व बॅंकने या कामाला हिरवा कंदील दाखविला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.