नवी दिल्ली – अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यापासून जागतिक धातू बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. शुक्रवारी जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्यानंतर भारतीय बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात माफक प्रमाणात वाढ झाली.
सोन्याचा दर 188 रुपयांनी वाढून 46,460 रुपये प्रति दहा गॉम या पातळीवर गेला. तर तयार चांदीचा दर 173 रुपयांनी वाढून 67,658 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,791 डॉलर चांदीचा दर वाढून 26.35 डॉलर प्रति औंस झाला. यासंदर्भात मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, काल सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानंतर आज थोडीफार खरेदी होऊन सोन्याला आधार मिळाला.
मात्र आगामी काळात सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या पतधोरणाचा डॉलरवर काय परिणाम होतो या आधारावर भारतातील सोन्या-चांदीचे दर ठरतील.