नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष निवडणुकीच्या स्पर्धेचे उतरले आहेत. सत्ताधारी केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्षासह काँग्रेस आणि जेडीएस पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान, याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कर्नाटक दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान, पंतप्रधानांनी विरोधकांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.
कर्नाटकमधील बेळगावमध्ये काल पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे लोक प्रचंड निराश झाले आहेत. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत आपली डाळ शिजणार नाही, असे काँग्रेसच्या लोकांना वाटत आहे. त्यामुळे ‘मोदी मरून जा, मोदी मरून जा’ अशा घोषणा ते देत आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.
बेळगाव येथील जाहीर सभेत नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेससारख्या राजकीय पार्टीपासून कर्नाटकमधील लोकांनी सतर्क राहायला हवं. काँग्रेसची लोक प्रचंड निराश झाले आहेत. जोपर्यंत मोदी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांची डाळ शिजणार नाही, असा विचार ते करत आहेत. त्यामुळे आजकाल सगळेजण ‘मोदी मरून जा, मोदी मरून जा’ अशा घोषणा देत आहेत. काही लोक माझी कबर खोदण्यात व्यग्र झाले आहेत. ‘मोदी तुझी कबर खोदली जाईल,’ असं ते म्हणत आहेत. पण ‘मोदी तुझं कमळ फुलेल’ असे देखील एकीकडे देशात म्हटले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधानांच्या या टीकेला आता काँग्रेसकडून नेमके काय उत्तर येते हे पाहणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे नुकतंच काँग्रेसचे अधिवेशन झाले यावेळी राहुल गांधीसह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती.