मानसिंगराव जगदाळे आक्रमक; तक्रारींचा वाचला पाढा; कामात सुधारणा करण्याच्या सूचना
सातारा – सातारा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी आक्रमक पवित्रा घेत दप्तर दिरंगाईवरुन प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. कामात सुधारणा करण्याच्या सूचनाही जगदाळे यांनी यावेळी दिल्या. त्यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत सदस्यांनी वारंवार नाराजीचा सूर आळवूूनही कारभारात सुधारणा झाली नव्हती. शिक्षण सभापतिपदाचा नव्याने पदभार घेतलेल्या मानसिंगराव जगदाळे यांनी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेवून आपली आक्रमकता दाखवून दिली.
शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दप्तर दिरंगाई आहे, फाईल्स टेबलवरुन हलत नाहीत, शिक्षकांच्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक होताना दिसत नाही, कार्यालयात कोणाचा कोणाला ताळमेळ नसल्याचे चित्र आहे, अशा अनेक तक्रारींचा पाढा जगदाळे यांनी वाचला. अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती झाल्याने सर्वजण काही काळ गोंधळून गेले.
मानसिंगराव जगदाळे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक टेबलवर कोणते काम चालते, प्रलंबित कामे किती आहेत, कामे प्रलंबित का राहत आहेत, आदी प्रश्नांची उत्तरे जगदाळे यांनी मागितली. सुमारे दीड तास ही आढावा बैठक झाली. शिक्षण विभागाचा कारभार सुधारण्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी
संबंधितांना दिल्या.